औरंगाबाद : निसर्गाचा ºहास रोखण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी पाच तरी झाडे लावली पाहिजे. मात्र, त्याआधी झाड डोक्यात रुजविणे आवश्यक आहे. नंतर ते जमिनीत लावा, असे आवाहन अभिनेता सयाजी शिंदे यांनी येथे केले. त्याच्या आवाहनाला उपस्थित वृक्षमित्रांनी जोरदार प्रतिसाद देऊन औरंगाबादच्या चारीदिशेला असलेले डोंगर हिरवेगार करण्याचा संकल्प केला.
प्रसंग होता, मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने व सह्याद्री देवराई आयोजित पहिले वृक्ष संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे शहरात आले होते. ‘आंब्याच्या नावानं चांगभलं, बेलाच्या नावानं चांगभलं... येऊन येऊन येणार कोण ‘झाडा’ शिवाय आहे कोण. एकानंतर एक पिढ्या येऊन जातील, पण आजोबाने लावलेली झाडे नातवांनाही आॅक्सिजन पुरवतील. झाड कधीच राजीनामा देत नाही, दिला तर परत घेत नाही’ असे म्हणत त्यांनी उपस्थित वृक्षमित्रांशी संवाद साधला. झाडांचा विषय सुरू असताना सयाजी शिंदे यांची मुलाखत घेणारे लेखक अरविंद जगताप म्हणाले की, सर्वत्र गुलमोहराची झाडेच आपणास दिसून येतात. या गुलमोहरावर अनेक कवींनी कविता रचल्या. या गुलमोहराने फक्त कवींची सोय लावली. सरकारने जाहीर करावे की, कविता लिहिण्यासाठीच ‘गुलमोहरा’चे झाड आहे. (हास्य). या झाडाचे वैशिष्ट्य काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा हसत सयाजी म्हणाले की, अनेक वैशिष्ट्यांपैकी एक या झाडाखाली कुत्रंही बसत नाही (हास्य), या झाडावर पक्षीही बसत नाहीत (हास्य). देशात अनेक ठिकाणी गाड्यांचे अपघात झाले ते याच वृक्षाला आदळून (हास्य). कवींमुळे गुलमोहर झाडाला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, हे झाड पर्यावरणासाठी दुश्मन आहे. त्यापेक्षा आंबा, वड, बेलाची झाडे लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘सात ताऱ्यांमध्ये जे गाव आहे ते सातारा’ असा उल्लेख करीत त्यांनी शहरालगतचे सातारा गावातील डोंगराला हिरवेगार करण्याचे आवाहन केले आणि कृषिमित्रांनी प्रतिसाद देऊन संकल्प सोडला. संजय वनवे स्मृतिसंध्यानिमित्त रंगकर्मी मित्र पुरस्कार प्रवीण पाटेवार, ज्येष्ठ रंगकर्मी मित्र पुरस्कार मदन मिमरोट, रंगकर्मी कैलास टापरे यांना देण्यात आला. तसेच वृक्षमित्रांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. तत्पूर्वी गायक डॉ.गणेश चंदनशिवे यांनी ‘औरंगाबाद शहराची महती’ सांगणारे गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने पुढील वर्षीही कार्यक्रम घेण्याचे आयोजक रमाकांत भालेराव यांनी जाहीर केले.
पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच पत्नीने फेऱ्या माराव्यासयाजी शिंदे म्हणाले की, वटपौर्णिमेला महिला आपल्याला हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. यात काहीच वाईट नाही, ही संस्कृती आहे. मात्र, प्रत्येक पत्नीने ठरविले पाहिजे की, माझ्या पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच मी फेरे मारले. बघा वडांच्या झाडांची संख्या वाढेल. या संकल्पनेचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.