गंगापूर : अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. या प्रथेला फाटा देत संदीप कुलकर्णी यांनी पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या रक्षा शेतातच विसर्जित केल्या आणि त्या जागेवर वृक्षारोपण केले.
मूळ कायगावचे मात्र सध्या गंगापूर शहरात वास्तव्यास असणारे संदीप गोविंदराव कुलकर्णी यांच्या पत्नी योगिता यांचे दुर्धर आजाराने रविवारी (दि.२७) डिसेंबर रोजी निधन झाले. कुलकर्णी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. योगिता कुलकर्णी यांचे वृक्षवेलीवर प्रेम होते. घराच्या आसपास त्यांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची झाडे लावली होती. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी व त्यांच्या स्मरणार्थ कुलकर्णी कुटुंबियांनी योगिता यांच्या अंत्यविधीनंतर रक्षा नदीत टाकल्या नाहीत. तर शेतात रक्षा विसर्जन करून त्याच जागी वृक्षारोपण केले. घरात दु:खमय वातावरण असतानादेखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरला आहे.
अंत्यसंस्काराचा एक भाग म्हणून केवळ मूठभर रक्षा कुलकर्णी परिवाराने नदीत विसर्जित केल्या. उर्वरित सर्व रक्षा त्यांच्या कायगाव येथील शेतीमध्ये त्यांनी खड्डा खोदून टाकल्या. त्यावर पेरू व जांभूळ वृक्षाचे रोपण केले. कपड्यांचे देखील नदीत विसर्जन न करता त्याचे दहन केले. कुलकर्णी परिवाराच्या या निर्णयामुळे गोदावरीचे प्रदूषण टाळण्याच्या कार्यात हातभार लागला आहे. यावेळी दीपक कुलकर्णी, मनोज आगारकर, संजय कुलकर्णी, प्रवीण आगारकर, पंकज रत्नाकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, नारायण इष्टके, अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
(फोटो कॅप्शन : पत्नीच्या निधनानंतर रक्षा आपल्या शेतात विसर्जित करून त्याठिकाणी वृक्षारोपण करताना संदीप कुलकर्णी व कुलकर्णी कुटुंबातील सदस्य.)