छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मियावाकी घनवन प्रकल्प अंतर्गत पाचशे रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि 'सीएआरपीई' यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत विधि विभागात नव्याने ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
मियावाकी घनवन प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या अगोदरही या प्रकल्पाअंतर्गत ४५ प्रकारच्या १० हजार ८९० वृक्षांची लागवड केली आहे. 'कलेक्टिव्ह गुड फाउंडेशन व बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन’ यांच्या 'काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
वृक्षांची लागवडीच्या वेळी प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान, संचालक नताशा जरीन, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, विधि विभागातील डॉ. नंदिता पाटील, डॉ. आनंद देशमुख, जितेंद्र पाटील, आदींची ही उपस्थिती होती. या रोपट्यांची योग्य ती निगा घेऊन वेळेवर पाणी देण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. येवले यांनी केल्या. रासेयोच्या संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रवीण तिदार, श्याम बन्सवाल व सुनील पैठणे यांनी केले.