वाळूज महानगर : सहारा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने रविवारी वैष्णोदेवी उद्यान रोडवरील एमआयडीसीच्या ग्रीन बेल्टवरील खुल्या भूखंडावर माजी सरपंच शेख अख्तर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक वजीर बेग, शेख अशरफ, मयूर चोतमल, शेख रशीद आदीसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
---------------------------
वडगाव-तीसगाव रस्त्यावरील पथदिवे बंदावस्थेत
वाळूज महानगर : वडगाव-तीसगाव रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारक व नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. पथदिवे बंद असल्याची ओरड त्रस्त नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे केल्यानंतर हे पथदिवे दुरुस्तीसाठी नेण्यात आले आहे; मात्र अद्यापपर्यंत पथदिव्यांची दुरुस्ती न करण्यात आल्याने या भागातील कामगार व नागरिकांना रात्री अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत आहे.
----------------------------
पारिजात नगरात रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरातील पारिजात नगरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आता पावसाळा सुरु झाला असून पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत असल्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ स्वरुपाचे अपघात घडत आहेत. किमान मुरुम टाकून खड्डे बुजवून गैरसोय थांबविण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरिकाकडून केली जात आहे.
--------------------------
काँग्रेसतर्फे सॅनिटायझर, मास्क वाटप
वाळूज महानगर : वाळूज महानगर काँग्रेसच्या वतीने बजाजनगरातील सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. काँग्रेसचे खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे पश्चिम तालुका उपाध्यक्ष सिद्राम पारे, वाळूजमहानगर अध्यक्ष अर्जुन आदमाने, नवनाथ मनाळ, नामदेव मानकापे, केशव होनाळी, संजय कांबळे आदीसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
----------------------------
सिमेन्स चौकात वाहतुकीची कोंडी
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील सिमेन्स चौकात फळ विक्रेत्याच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. फळे खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची अशी मागणी आकाश शिंदे, देविदास साळुंके, अयान शेख आदींनी केली आहे.
--------------------