लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मापात पाप करणाऱ्या लखनौआणि ठाणे येथील पेट्रोलपंपांचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी रविवारी शहरातील विविध कंपन्यांच्या चार पेट्रोलपंपांची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत एकाही पेट्रोलपंपावर ‘मापात पाप’ आढळून आले नाही. मात्र अचानक झालेल्या तपासणीमुळे पेट्रोलपंपचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.पेट्रोलपंपांत इलेक्ट्रॉनिक्स चिप्स बसवून ग्राहकांना कमी इंधन देण्याचा प्रकार होत असल्याचे ठाणे आणि उत्तर प्रदेशातील विविध पेट्रोलपंपांवर नुकतेच आढळून आले. ग्राहकांच्या फसवणुकीचे असे प्रकार शहरातील पंपांवर होतात काय याविषयी तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले. आदेश प्राप्त होताच वैध वजन- मापे विभाग आणि संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकारी, तंत्रज्ञांना सोबत घेऊन पोलिसांनी शहरातील उस्मानपुरा येथील युनिक आॅटो सर्व्हिसेस, क्रांतीचौकातील हिंद सुपर सर्व्हिसेस, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप आणि बसस्थानक रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपांची झाडाझडती घेतली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू होती. या मोहिमेविषयी माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, शहरातील विविध पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल वितरणासाठी टोकीयम, गिल्बर्गो, ट्रेझर वाईन, मिटको आदी कंपन्यांचे मशीन बसविले आहे. या मशीनमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक होते का, याविषयी आज अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये वैध वजन-मापे निरीक्षकांनी शासकीय मापानुसार मशीनमधून वितरित होणारे इंधनाचे प्रमाण बरोबर आहे का? याविषयी खात्री केली.
शहरातील चार पेट्रोलपंपांची झाडाझडती
By admin | Published: June 19, 2017 12:38 AM