छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे. दिल्ली गेटच्या दोन्ही बाजूला गुरूवारी २०० बोलगार्ड लावून दुभाजक तयार करण्यात आले. शिवाय खासगी जेसीबीच्या मदतीने साइडपट्ट्याही नीट करण्यात आल्या.
शनिवारी, रविवारी तीन ते चार तास या घाटात वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे. त्यात पुढे जाण्याच्या स्पर्धेत वाहनचालकांकडून वाहने बेशिस्तपणे वळवणे, लेन तोडली जाते. परिणामी, पर्यटकांनाही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याला पर्यायी मार्गासाठी वारंवार मागणी होत असतानाही प्रशासनाकडून अद्यापही त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. अखेर वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत दौलताबाद, खुलताबाद मार्गावर बोलगार्डने दुभाजक तयार केला आहे.
-दिल्ली गेट ते खुलताबादकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदी ४८ फूट आहे.- डावी बाजू २४ तर उजवी २४ फुटांची बाजू सोडून मधे हे बोलगार्ड बसविण्यात आले.- रस्त्याच्या दोन्ही बाजूला २ फुटांच्या साइडपट्ट्या आहेत.- दिल्ली गेट ते दौलताबाद दरम्यानचा रस्ता ३० फूट रुंद असून, दोन्ही बाजूने प्रत्येकी १५ फूट जागा सोडून बोलगार्ड लावण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्षपोलिसांनी यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. वाहनचालकांसाठी सूचना फलक, अपघातप्रवण क्षेत्र, शिस्त व वेग मर्यादेबाबत फलक नाहीत. जे आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे. साइडपट्ट्या दुरुस्त केल्यास वाहनांना अधिक जागा मिळेल, असे मतही पोलिसांनी नोंदवले.