वाळूज महानगर : पर्यावरणाला हानीकारक असल्याने राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा कायदा केला आहे. पण संबंधित विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने हा कायदा केवळ कागदावर राहिला आहे. प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई मंदावल्याने घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे वाळूज महानगर परिसरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे.
राज्य सरकारने ५० एमएमपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन व वापरावर बंदी घातली आहे. सरकारच्या या धोरणामुळे अनेक प्लास्टिक उद्योग बंद पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक उत्पादन करणाºया कारखान्यावर छापा मारुन कारखाना सिल करुन कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला होता.
तसेच रांजणगाव, बजाजनगरातील बाजारपेठेत अनेक व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईने व्यवसायिकांनी प्लास्टिक पिशवी व वस्तू वापरणे बंद केले होते. पण व्यवसायिकांनी पुन्हा प्लास्टिक वस्तू वापरास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बजाजनगरसह रांजणगाव, वाळूज, पंढरपूर, सिडको परिसरातील बाजारपेठेतील कपडे, खाद्य पदार्थ, किराणा दुकान, शोभेच्या वस्तूची दुकाने, भाजीमंडई आदी ठोक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांडूनही सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिक ग्लास, प्लेट, चहाचे कप आदी वस्तूची विक्री तर पिशवीचा वस्तू देण्यासाठी वापर केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बंदी फक्त कागदावर ..संबंधित विभागाकडून या निर्णयाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. स्थानिक प्रशासनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करित आहे. शहरासह ग्रामीण भागातही बिदास्तपणे सुरु असलेल्या प्लास्टिक पिशवी व वस्तूच्या वापरावरुन हा कायदा फक्त कागदावरच असल्याचे दिसते.