लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कामकाजाचा वेळ संपल्यानंतर सायंकाळी सर्व निर्णय घेतात. या अधिका-यांना एक गट पार्टी देतो. या बदल्यात हे अधिकारी मतदार, उमेदवारांना पात्र-अपात्र करण्याचा निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. या अधिका-यांचे हॉटेलमधील फुटेजही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत नामांकन दाखल झाल्यानंतर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुुरुवात झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपाला सुुरुवात झाली. या गैरप्रकारांवर आक्षेप घेण्यासाठी आ. चव्हाण यांनी उमेदवारांसह निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रदीप जब्दे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केज तालुक्यातील बनसारोळा येथील महाविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या नेमणुकीची चौकशी करण्यासाठी तिस-यांदा समिती नेमली आहे. दोन वेळा अहवाल आला. त्यानंतर तिस-यांदा चौकशी करण्यात येत आहे. या चौकशी समितीमध्ये विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार असलेले डॉ.अशोक काकडे, डॉ. किशोर साळवे, डॉ. शंकर अंभोरे यांचा समावेश आहे. यातील तीन जण उमेदवार आहेत. हे उमेदवार मतदार असलेल्या प्राध्यापकावर दबाव टाकत असल्याचा आरोपही आ. चव्हाण यांनी केला. याशिवाय संजय निंबाळकर, डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य कविता प्राशर, डॉ. दिलीप गरुड यांनी उत्कर्ष पॅनलतर्फे नामांकन दाखल केले; मात्र विद्यापीठ विकास मंचने हे उमेदवार आपले असल्याचे दाखवले. यातील संजय निंबाळकर यांनी आपले नाव न विचारता छापून आणल्याबद्दल संबंधितांवर बदनामीचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिल्याचा दावाही आ. चव्हाण यांनी केला, तसेच एकूण उमेदवारांपैकी उत्कर्षच्या पाच जागा बिनविरोध निवडून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य शिवाजी मदन, प्राचार्य कविता प्राशर, दत्तात्रय आघाव, कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे, डॉ. स्मिता अवचार, प्रा. सुनील मगरे, राहुल म्हस्के आदी उपस्थित होते.
विद्यापीठात रात्रीस खेळ चाले; अधिका-यांना मिळते पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:23 AM