पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात गेल्या पंधरा दिवसात २ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. १ जून ते १६ जून दरम्यान नाथसागरावर १५० मि.मी पावसाची नोंद झाली असून यामुळे धरणातील जलसाठ्यात ५६ दलघमीने वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात गुरूवारी दाखल होण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी धरणात आवक सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जायकवाडी जलाशयावर १६ जून पर्यंत १५० मिमी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. धरण परिसरात एक जून रोजीच ४२ मिमी अशा दणकेबाज पावसाने प्रारंभ झाला होता. १ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली असल्याचे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून ३ जून पासून गोदावरीत कमी जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी पात्रात १२ उच्च पातळी बंधारे असून यात तांदळज , मजूर , दत्त सागर , हिंगणा , डाऊख , सडे शिंगवी , पुणतांबा , नेऊर , वांजरगांव , खानापूर , कमळापूर व नागमठान या बंधाऱ्याचा समावेश आहे.
या बंधाऱ्याची घटलेली पाणीपातळी भरून काढत नाशिकच्या पाण्याने बुधवारी वैजापूर तालुक्यातील नागमठान बंधारा ओलांडला असून गुरूवारी हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी नांदूरमधमेश्वर वेअर मधून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी नाशिक ते जायकवाडी दरम्यान गोदावरी नदीचे पात्र प्रवाही झाल्याने यापुढील काळात नाशिकचे पाणी विना अडथळा जायकवाडी धरणात जमा होईल असेही धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.
सध्या धरणात ३७% जलसाठा धरणात एकूण जलसाठा ५४ टीएमसी असूनया पैकी उपयुक्त जलसाठा २८ टीएमसी आहे. जायकवाडी धरणात ३३% पेक्षा जास्त जलसाठा असल्यास सिंचनासाठी व पिण्यासाठी पूर्ण आवर्तने देता येतात. धरणातील जलसाठा आजच ३७% असल्याने यंदा धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी देताना कुठलीच अडचण भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.