औरंगाबाद : रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून, त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बियाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३८ क्विंटलच्या आसपास बियाणे विक्री विभागीय कृषी विस्तार केंद्रातून झाली. आता कोणतेच बियाणे शिल्लक उरलेले नाही.
गव्हाचे बियाणे उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली. तर पेरणीत शेजारच्या शेतकऱ्यांच्या अनुकरणापेक्षा उपलब्ध साधनसामुग्री, पाणी, शेतीचा पोत याचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यापीठाच्या हरबरा २० क्विंटल, ज्वारी ६.५ क्विंटल, करडी ६ क्विंटल, जवस दोन क्विंटल, काबुली हरबरा ३ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्याची पूर्ण विक्री झाली. रब्बी ज्वारी आठवडाभरात थंडी वाढण्यापूर्वी पेरणी संपवावी तर ३१ नोव्हेंबरपूर्वी बागायती हरबरा पेरणी संपायला हवी अशी शिफारस कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. तर गव्हाची पेरणीही ३० नोव्हेंबरपूर्वी करण्याच्या सूचना देताना कापसाचे अतिवृष्टीत खूप नुकसान झाले. तरीही फरदडसाठी मेहनत वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या पिकाचा विचार करण्याचा सल्ला ठोंबरे यांनी दिला आहे. रब्बीचे नॅशनल सीड काॅर्पोरेशन, कृषी विभागाकडूनही बियाण्यांची उपलब्धता असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिल, बियाण्यांच्या पिशव्या संभाळून ठेवापेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा, पेरणीतच खत पेरणीही गरजेची आहे. तर तणनाशकाचा वापर करतांना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घेऊन ते संभाळून ठेवा. तसेच पेरणीवेळी बियाण्यांच्या पिशव्या, लेबलही संभाळून ठेवण्याच्या सूचना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.