औरंगाबाद : आपल्या जीवाची पर्वा न करता २४ जून २०११ रोजी एस. टी. बसमधील तब्बल ४५ प्रवाशांचा जीव वाचविताना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जाणारे चालक नवनाथ बोडखे यांना या अपघाताच्या कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का मिळाला. मंगळवारी नवनाथ बोडखे यांना विभाग नियंत्रक संजय सुपेकर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची भेट देण्यात आली.शासनाच्या योजनेनुसार एस. टी. महामंडळातील अपंग कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या वाहनांचे मंगळवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यामध्ये नवनाथ बोडखे यांच्यासह वरिष्ठ लिपिक (लेखापाल), ए. एस. राजहंस, हेमा कांबळे (वैजापूर आगार लिपिक), शिवाजी साखळे या चार कर्मचाऱ्यांना वाहन देण्यात आले. दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी इतरांवर विसंबून राहण्यापेक्षा स्वत:च स्वावलंबी होण्यासाठी देण्यात आलेले वाहन महत्त्वाचे ठरणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले. २४ जून २०११ रोजी पुण्याहून औरंगाबादकडे निघालेली एस. टी. महामंडळाची बस अहमदनगरजवळ आली असता समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरचे टायर फुटले आणि दुभाजक तोडून कंटेनर सरळ बसच्या दिशेने आले; परंतु यावेळी नवनाथ बोडखे यांनी समयसूचकता दाखवून बस डाव्या बाजूने वळविल्यामुळे मोठा अपघात टाळला. तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी आपणास अपंगत्व आले होते, त्याच दिवशी हे वाहन मिळाले. परंतु झालेल्या अपघातात प्रवाशांचे जीव वाचविल्याचे समाधान आयुष्यभर राहणार आहे. अपघात आणि अपंगत्व आल्याच्या त्या कटू आठवणींच्या दिवशीच वाहन मिळाल्याचे सांगताना नवनाथ बोडखे भावुक झाले.
‘त्या’ कटू आठवणींच्या दिवशी सुखद धक्का
By admin | Published: June 25, 2014 1:20 AM