वासडी : नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेले खातखेडा आरोग्य उपकेंद्राची वाट लागली आहे. कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या या केंद्राला दोन वर्षांपासून डॉक्टर तर नाहीच नाही. त्यात आग्ग्य सेवकाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील लोक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. तर त्यांना उपचारासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत आहे.
खातखेडा आरोग्य उपकेंद्रावर अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावाचा कारभार चालतो. या केंद्रावर महिला आरोग्य सेविका तुपे व आरोग्य सेवक डी. के. साळवे कार्यरत आहेत. ते आठवड्यातून काही दिवस हजर राहून रुग्णांना उपचार देतात. कारण त्यांच्यावर आजूबाजूच्या तीन गावांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी नेमके ते हजर नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. या केंद्राला स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात यावा, अशी मागणी असून देखील आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
खातखेडा येथे आरोग्य उपकेंद्र सुरू झाल्यानंतर गावातील नागरिकांना वाटले की, आपल्या आरोग्याची चिंता मिटली आहे. गरजेची वेळी आपल्याला उपचार मिळतील, अशी आशा निर्माण झाली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील नागरिकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. हे उपकेंद्राची दुरवस्था झाल्याने व कोणतेही उपचार मिळत नसल्याने नागरिकांना सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाचनवेल आरोग्य केंद्रात जावे लागते. किंवा खासगी दवाखाना गाठावा लागतो.
२००८-०९ साली मी सरपंच असताना गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणले. २०१० मध्ये इमारत बांधकाम पूर्ण झाली. त्यानंतर काही वर्षे या केंद्रात निवासी आरोग्य सेविका होत्या. त्यामुळे येथील रुग्णांना उपचार वेळेवर मिळत होते. आता निवासी आरोग्य सेवक व डॉक्टरांची नियुक्ती नाही. आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी निवासी आरोग्य सेवकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. ज्ञानेश्वर पवार, उपसरपंच, खातखेडा.
फ़ोटो - खातखेडा येथील आरोग्य केंद्राची झालेली दुर्दशा.