राजकुमार जोंधळे लातूरकेंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे चलन तुटवडा असून, रिअल इस्टेटचे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या सहा दिवसांत एकही मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार न झाल्याने रजिस्ट्री झाली नाही. सरकारच्या या निर्णयाचा थेट रिअल इस्टेटमधील व्यवहारावर परिणाम झाला आहे.लातूर शहर आणि जिल्ह्यातील रिअल इस्टेटमधील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असून, मालमत्ता खरेदी करणाऱ्यांकडे रोखीने व्यवहार करण्यासाठी हाती पैसा नाही. तर अनेक जण जुन्या नोटा देवून व्यवहार करण्यासाठी पुढे येत असले तरी, डेव्हलपर्स आणि बिल्डरांकडून या व्यवहारांना नकार दिला जात आहे. जुन्या नोटा घेऊन त्या कशा बदलाव्यात या विवंचनेत अनेक जण आहेत. रिअल इस्टेटमधील कोट्यवधींच्या व्यवहारांना या निर्णयामुळे ब्रेक लागला आहे. ‘लोकमत’ने या क्षेत्रातील उलाढालीचा आढावा घेतला असता, गेल्या सहा दिवसांत आर्थिक उलाढाल झाली नसल्याचे समोर आली आहे. लोकांच्या हाती पैसाच नाही...तर व्यवहार कसे करणार? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रो-हाउस, फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना पूर्वी मंजूर झालेल्या बँक कर्जातून हे व्यवहार करण्यासाठी खरेदीदार पुढे येत आहेत. मात्र, बँकेतच पैशांचा तुटवडा असल्यामुळे व्यवहारासाठी लागणारा पैसा आणायचा कोठून, हा यक्षप्रश्न या क्षेत्रात आहे.
प्लॉट, घर खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 12:42 AM