छत्रपती संभाजीनगर : बनावट कागदपत्रांवर डॉक्टरच्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या नावावर असलेली एक एकर शेतजमीन बळकावण्याचा चार जणांनी प्रयत्न केला. तसेच डॉक्टर दांम्पत्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २ नोव्हेंबर २०२२ ते ३० मार्च २०२३ या काळात घडल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.अय्युब खान दबीर खान (रा.गल्ली नंबर ३१, नुर मस्जिदजवळ, बायजीपुरा) यांच्या पत्नीच्या नावे चिकलठाणा परिसरातील वरूड रोडवर असलेल्या गट क्रमांक ३०० मध्ये एक एकर शेत जमीन आहे. २ नोव्हेंबर २०२२ ते ३० मार्च २०२३ या काळात अब्दुल ख्वाजामिया शेख, साजीद शेख अब्दुल शेख (दोघे रा.हिनानगर, चिकलठाणा) व सोबतच्या दोन महिला असे चार जणांनी डॉ.अय्युब खान यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या शेतीची बनावट कागदपत्रे तयार केली.
तसेच त्याचे बक्षीसपत्र तयार करून डॉ.खान यांच्या पत्नीच्या बनावट स्वाक्षर्या करून शेती बळकावण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतातील घरावर कब्जा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डा. खान यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.