लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. शहरातील मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. मारेकºयांना अटक करण्यासाठी संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह सदर बाजार पोलीस ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. अंबडमधील गगराणी प्रकरणानंतर घडलेल्या या तशाच स्वरुपाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.नितीन कटारिया हे दुपारी चारच्या सुमारास मोदीखाना परिसरातील रुपानिवास येथे होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना घराबाहेर बोलावले. कटारिया बाहेर आल्यानंतर काही कळायच्या आतच दुचाकीवरून आलेल्या इसमाने कटारिया यांच्या गळ्यावर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. अचानक हल्ल्यामुळे कटारिया यांना बचाव करण्याची संधी मिळाली नाही. ते घरासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून (क्र.११११) फरार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.स्थानिक नागरिकांनी जखमी कटारिया यांना तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आयबाइकच्या मदतीने घटनास्थळ सील करण्यात आले. दरम्यान, संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून सदर बाजार पोलीस ठाण्यात आणला.संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ठाण्यातून नेणार नाही, असे भूमिका जमावाने घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी मृत नितीन यांचे वडील ताराचंद कटारिया यांच्या फिर्यादीवरून संशयित सुनील रुपा खरे (३५, रा. खवा मार्केट), चंदू धन्नू घोचीवाले (३२), अब्दुल रहीम सत्तार खान उर्फ सादेक खान (४२, रा.राममूर्ती) शकील बुरान घोचीवाले (३०), हमीद बुरान घोचीवाले (२७) सलीम बुरान घोचीवाले (३०), अफजल लल्लू मुन्नीवाले (२६), अकबर बुरान घोचीवाले यांच्यासह एक महिला व अज्ञात मारेकºयाविरुद्ध खुनाचा कट रचणे व खून करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतल्याचे सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.
प्लॉटिंग व्यावसायिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:59 AM