औरंगाबाद : जलमित्र अभियानांतर्गत प्लंबर असोसिएशनने शहरातील २०० घरांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून डबल सेंच्युरी मारली आहे. दुष्काळाची दाहकता अन् पावसाच्या हुलकावणीची सवय झालेल्या मराठवाड्यात लोकमतने जलमित्र अभियानास सुरुवात केली. यास विविध संस्था, संघटना, मित्रमंडळांचा पाठिंबा मिळत आहे. दिवसेंदिवस जलमित्रांची संख्या वाढत आहे. अभियानाच्या सुरुवातीला शहरातील प्लंबर असोसिएशनसोबत जलमित्र टीमने चर्चा केली आणि त्यांना अधिकाधिक पाणी बचतीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यास सांगण्यात आले. प्लंबर असोसिएशनने सुद्धा जलजागृतीचा विडा उचलला व मागील महिनाभरातच तब्बल २०० घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. जलमित्रने दिलेल्या आवाहनास शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आणि घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. महानगरपालिकेने नवीन घरांना वॉटर हार्वेस्टिंग करण्याची सक्ती केली आहे; परंतु जुन्या पद्धतीच्या घरांमध्ये वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय उपलब्ध नव्हता. यावर उपाय म्हणून बऱ्याच ठिकाणी बोअरवेलमध्ये पाणी सोडण्यात येते. आता रिचार्ज पिट (शोषखड्डा) व रिचार्ज वेलच्या माध्यमातून १ हजार स्क्वे. फुटाच्या घरामध्ये वार्षिक ६० हजार लिटर पाणी साठवता येते. यामुळे जवळपास ९ कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे. प्लंबर असोसिएशनने याच पद्धतीचा वापर करीत शहरातील २०० घरे जलसंवर्धित केली आहेत. जुन्या पद्धतीचा वापर केलेल्या बोअर्सला आजही पाणी आहे; परंतु रिचार्ज पिटमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. प्रत्येक घरानुसार रिचार्ज पिटची रचना करावी लागते. तसेच हार्वेस्टिंग करताना शहराच्या पर्जन्यमानाचा विचारही केला जातो. त्याचबरोबर फायदा अधिकाधिक कसा होईल, याचा विचार हार्वेस्टिंग करणारे करत असतात, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीरंग फरकाडे यांनी दिली. जलमित्र अभियान मोहीम यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, गणेश जाधव, बाळासाहेब भोसले, चंद्रशेखर कुबेर आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
प्लंबर असोसिएशनचे हार्वेस्टिंगचे द्विशतक
By admin | Published: June 05, 2016 12:07 AM