परंडा : तालुक्यातील काही गावाच्या शिवारातील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नसलेला कॅनॉल दर्शवून आगाऊ स्टँपड्युटी आकारून शेतकर्यांची लूट केली जात असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार त्वरित न थांबविल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सूर्यवंशी यांनी तहसीलदारांसह जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील देऊळगाव, तांदूळवाडी, शेळगाव परिसरात आजवर कुठलेही धरण अथवा मध्यम प्रकल्पाच्या अनुषंगाने कॅनॉलची निर्मिती करण्यात आलेली नाही. असे असतानाही या शिवारातील जमिनी खरेदी-विक्री व्यवहारात मात्र कॅनॉल क्षेत्र दर्शवून शेतकर्यांकडून आगाऊ स्टँप ड्युटी घेतली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा आंदोलन छेडू, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
नसलेला कॅनॉल दाखवून शेतकर्यांची लूट
By admin | Published: June 02, 2014 12:07 AM