लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : 'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी परभणी शहरात दुचाकी रॅली काढून मुंबईच्या मोर्चासाठी जनजागृती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालून देत मोर्चाला येण्याचे आवाहन केले.९ आॅगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्या अनुषंगाने मोर्चाच्या जनजागृतीसाठी परभणी जिल्ह्यातील मराठा समाज सरसावला आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून आता गावोगावी बैठकांवर जोर दिला जात आहे. मोर्चाला जाण्या-येण्याची सोय, तेथील मार्ग, व्यवस्था, आचारसंहिता आदीची माहिती दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत शुक्रवारी सकल मराठा समाजाने दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी सोशलमीडियावर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात दुचाकी रॅली परभणीकरांनी अनुभवलीे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दुचाकीस्वार गाड्यांना भगवे झेंडे लावून हजर झाले होते.शिस्तीत गाड्या एकामागोमाग लावण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन ही रॅली स्टेशनरोडने निघाली. बसस्थानक, उड्डानपुल, जिल्हा परिषद मार्गे विसावा फाटा पर्यंत रॅली गेली. तेथून वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथून वसमत रोडने जात शिवाजी महाविद्यालयमार्गे संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत हजारोंच्या संख्येने मराठा युवक, युवती व महिलांसह दुचाकीस्वार सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, या जय घोषाने शहराचे मुख्य रस्ते दणाणून गेले.दरम्यान, मागील वर्षी भव्य व आदर्श मूक मोर्चा परभणीत काढण्यात आला होता. मात्र शासनाकडून मागण्या मान्य न झाल्यामुळे ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हक्कासाठी एकतेची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:55 PM