जायकवाडी : नम्रतानगर-ईसारवाडीतील १९ वर्षीय युवकाने भांडणाच्या त्रासाला कंटाळून २७ फेब्रुवारीला विष प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी युवकाला उपचारासाठी औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या युवकाचा शनिवारी (दि. ६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन हरी वीर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर नितीनच्या कुटुंबियांनी त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या चार जणांविरोधात एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, नितीन हरी वीर हा घरासमोर उभा होता तेव्हा शेजारच्यांशी झालेल्या भांडणात त्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या भीतीने नितीनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ सचिन वीर याने पैठण पोलीस ठाण्यात एजाज ऊर्फ कालू शेख, जावेद शेख, आलादिन शेख, आफसाना शेख (रा. नम्रतानगर, ईसारवाडी परिसर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या भावाने आत्महत्या केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिनेश दाभाडे, शरद पवार, राजेंद्र जिवढे हे करत आहेत.