जाफराबाद : माध्यान्ह भोजन योजनेतंर्गत देण्यात आलेल्या खिचडीतून ९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील हिवराकाबली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी दुपारी घडली. या विद्यार्थ्यांना तात्काळ जाफराबादच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधेचे कारण मात्र समजू शकले नाही.हिवराकाबली येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची पटसंख्या १४५ आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा भरली. दुपारच्या भोजनाच्या सुटीत विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली. शाळेतील सर्व मुलांनी खिचडी खाल्ली. काही वेळानंतर पायल दांडगे, साक्षी बोर्डे, निकिता बोर्डे, पूजा जाधव, लक्ष्मी जाधव, रोहिणी बोर्डे, सोनल भदरर्गे, अर्चना मोरे, भागवत जाधव या विद्यार्थ्यांना मळमळ होऊन उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना तात्काळ जाफराबादच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतल्याने एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. (वार्ताहर)
खिचडीतून नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: January 17, 2017 12:37 AM