औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळेत १० लाख रुपयाचा संगणक कक्ष उभारल्यानंतर शाळेसाठी २ एकर जमीन आणि ६० लाख रुपयाचा निधी उभारण्याचा संकल्प पोखरी ग्रामस्थांनी पूर्ण केला आहे. २०१९ मधील डिसेंबर महिन्यात शासकीय मदतीशिवाय पोखरी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत १० लाखाचा निधी खर्च करून अत्याधुनिक संगणक कक्ष उभारल्यानंतर हा संकल्प केला होता.
पोखरी ग्रामस्थांचे ठरले; १० लाखाच्या संगणक कक्षानंतर शाळेसाठी ५० लाख उभारणार
वैजापूर तालुक्यातील पोखरी जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय बनविण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी १५ डिसेंबर २०१९ रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत प्रत्येक गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्यास सहमती दर्शविली. यावेळी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी विद्यमान शाळा आंतरराष्ट्रीय करताना तेथील जागा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा गावकऱ्यांनी शाळेसाठी २ एकर जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार खाजगी व्यक्तीची जमीन खरेदीसाठी लागणारा निधीही गावातूनच उभारण्यासाठी सहमती झाली. यात गावातील प्रत्येक घरासाठी (प्रतिउंबरा) ५ हजार रुपये आणि ५ एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्या कुटुंबाला त्यापुढील प्रतिएकर शेतीला १ हजार रुपये अधिक भार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारला निधीमातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळेला मदत करण्यासाठी गावातील शासकीय आणि अशासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामस्थांनी निधीसाठी पुढाकार घेतला. तसेच गावामध्ये धार्मिक कार्यक्रमांवर पैसे खर्च न करता ते पैसे शाळेसाठी खर्च करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यासोबतच काही निधी सीएसआर फंडातून जमा झाला.