छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात गतवर्षी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पोकरा) अंमलबजावणी करताना कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संगनमत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याविषयी जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ ही वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार महिन्यांनतर अहवाल सादर केला आहे.
या अहवालावर कृषी विभागाकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. ही बाब लक्षात घेऊन शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, शेततळे अस्तरिरकण, फळबाग योजना, तुती लागवड,मधुमक्षिका पालन आदी योजनांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. पैठण तालुक्यातील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खादगाव, वडजी, रांजणगाव दांडगा, कुतुबखेडा, दादेगाव इ. गावांतील शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री योजनेचा लाभ देऊन लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याविषयी लोकमतने जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ या टॅगलाईनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली होती.
या वृत्तमालिकेची दखल घेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने विभागीय कृषी सहसंचालकांनी वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी ए. वाय. आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशी समितीला पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, चौकशी पथकाने सखोल चौकशी करत अत्यंत संथपणे चौकशी केली. या समितीने आपला अहवाल गेल्या शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांना सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालावर विभागीय कृषी सहसंचालक काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.