वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ध्रुवतारा बायाेटेक प्रा. लि. या कंपनीला मंगळवारी (दि.२) मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत कंपनीची तीन मजली इमारत , तयार सुटे भाग व कच्चा माल जळून भस्मसात झाला. यात अंदाजे ५ कोटी रुपयांची हानी झाली. सुदैवाने या आगीत जीवित हानी टळली असून नाईट शिफ्टमधील सर्व २५ कामगार सुरक्षित आहेत.
अशोक बलभीम थोरात (रा. श्रेयनगर, औरंगाबाद) यांच्या दर्शन ग्रुपची वाळूज एमआयडीसीत (प्लॉट क्रमांक डब्ल्यू ९७) ध्रुवतारा बायोटेक प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठीचे विविध प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्याचे उत्पादन करुन नामांकित कंपन्यांना पुरविण्यात येते. मंगळवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास कंपनीला आग लागली. रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांनी त्वरित वाळूज अग्निशमन व एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन पथकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीतील प्लॉस्टिकचे तयार पार्टस व रॉ-मटेरियलने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट व आगीच्या ज्वाळांमुळे लगतच्या कंपनीतील कामगार, उद्योजक यांनीही घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन विभागाच्या चार बंबांनी केले ५ तासानंतर आगीवर नियंत्रण
सुरुवातीला गरवारे कंपनीच्या अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने वाळूज, बजाज व मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. जवळपास ३० खाजगी टँकर मागवून सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना यश आले.
या घटनेत कंपनीची तीन मजली इमारत तसेच प्लॉस्टिक मोल्डिंग मशिनरी, ऑटोमोबाईल्सचे स्पेअर पार्टस, लॅपटाॅप, संगणक, कुलर, फर्निचर, रॉ-मटेरियल्स आदी जळून खाक झाले. तीन मजली इमारतीचा केवळ सांगाडा उरला आहे. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अशोक थोरात यांनी वर्तविला आहे. या घटनेत जवळपास ५ कोटी रुपयांची हानी झाल्याचे उद्योजक थोरात यांनी सांगितले.
नाईट शिफ्टमधील सर्व २५ कामगार सुरक्षित
रात्रपाळीत २५ कामगार आले होते. कामगारांनी आग विझविण्यास मदत केली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने जीव वाचविण्यासाठी सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने जीवित हानी टळली. डोळ्यादेखत कंपनी जळत असताना अनेक कामगारांना अश्रू अनावर झाले होते.
उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा दिलासा
या आगीची माहिती वाऱ्यासारखी वाळूज उद्योगनगरी व शहरात पसरताच मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले, अजय गांधी, विकास पाटील, उद्योजक अशोक काळे, सदानंद पाटील, सीएमआयएचे शिवप्रसाद जाजू, सीआयआयएचे रमण अजगावकर आदी उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योजक अशोक थोरात यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.
फोटो ओळ- वाळूज उद्योगनगरीतील ध्रुवतारा बायोटेक प्रा. लि. या कंपनीला लागलेली आग विझविताना अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी.
फोटो क्रमांक- आग १/२/३/४/५
------------------------------------