शेंद्रा (औरंगाबाद ): बुधवारपासून (दि.४) सुरू होणाऱ्या मांगीरबाबा यात्रेत यंदा गळ टोचण्यास बंदी करण्यात आली असून, शासनाच्या निर्देशानुसार नोटीस बजावल्याने देवस्थान, ग्रामपंचायतीने गळबंदीसाठी जनजागृती सुरू केली आहे.
श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी. आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या गळ टोचण्यास बंदी घालण्यासाठी लालसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. देवस्थान समिती व ग्रामपंचायत जनजागृतीचे पोस्टर, पत्रके, बॅनर लावून भाविकांना जागृत करीत आहेत. यात्रा काळात येणारा समाज हा लाखोंच्या संख्येने उपस्थित असतो. त्यात गळ टोचून नवस फेडण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यांना गळदेण्यास आम्ही निश्चितच मनाई करणार आहोत. मात्र, त्यावेळी वाद उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी वाढीव बंदोबस्त द्यावा, प्रशासनाचे अधिकारीदेखील यावेळी येथे उपस्थित राहावे, अशी मागणी देवस्थान समितीने केली आहे.
देवस्थान समितीने सांगितले की, लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या समाजाला विरोध करताना आम्हाला गावाच्या सुरक्षेचादेखील विचार करावा लागतो. समितीचे फक्त ५० स्वयंसेवक असतात. समाजाचा उद्रेक होणार नाही, अशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळावी लागते. त्यासाठी सर्वांचीच उपस्थित आवश्यक आहे. देवस्थान समिती गळ देणार नाही; परंतु अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी पोलीस, प्रशासन, लालसेनेच्या पदाधिकाऱ्यांची राहील, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, सदस्य वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ यांनी सांगितले.
स्थानिकात कोणी गळ टोचत नाहीगळ टोचून नवस फेडणारे भाविक बाहेरचे असून, त्यांना विरोध करताना होणारा वाद देवस्थान समिती व गावाला न परवडणारा आहे. त्याकरिता आदेशाप्रमाणे प्रशासनानेही सुरक्षिततेसाठी सहकार्य देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन भाविकांना सामंजस्याने गळबंदीला विरोध करावा, असे आवाहन सरपंच शुभांगी रवींद्र तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, ग्रामपंचायत सदस्य शिवगंगा कचकुरे, भास्कर कचकुरे, रेखा नवगिरे, किरणबाई कचकुरे, नूरजहाँ पठाण, रेखा तांबे यांनी केले आहे.
अवैध धंदे बंद करागेल्या वर्षी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात जुगारासारखे अवैध धंदे व देशी दारूची विक्री सर्रास सुरू होती. शिवाय मागील वर्षी महिलांचे दागिने व पाकीट मारण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली होती. यावर्षी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी आवश्यक पावले उचलावीत, अशी सूचना देवस्थान समितीने केली आहे.
यात्रेसाठी इनामी जागा आरक्षित ठेवाशेंद्रा एमआयडीसीमुळे या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस बांधकाम वाढत असल्याने जागेची अडचण निर्माण होत आहे. यात्रा भरण्यासाठी (शासकीय जमीन) गणपती इनाम गट नं. ६५ व ७३ मधील १० ते १२ एकर जागा शिल्लक आहे. निदान ही जागा तरी यात्रा भरण्यासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी देवस्थान समितीने केली आहे.