लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : वाहनांत क्षमतेपेक्षा जादा जनावरे बसवून वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी कारवाई केली. मात्र, ताब्यात घेतलेल्या जनावरांना सांभाळण्याची जवाबदारी पोलिसांवर आली आहे. त्यांना चार दिवसांपासून नियमित चारापाण्यासह जनावरांची निगा राखावी लागत आहे. त्यामुळे राजूर पोलिस चौकीला चारा छावणीचे स्वरूप आले आहे.कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासह आरोपींना पकडण्याचे काम पोलिसांकडे आहे. मात्र जनावरांची काळजी घेण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. ११ मे रोजी राजूर जालना मार्गावर एका आयशर टेम्पोतून क्षमतेपेक्षा अधिक जनावरे घेऊन वाहतूक केली जात होती. काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी राजूर पोलिसांकडे संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी आयशर टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली असता एका वाहनांत तब्बल १३ मोठी जनावरे आढळून आली. पोलिसांनी टेम्पो चालकांवर कारवाई करून जनावरांसह टेम्पो ताब्यात घेतला. शुक्रवारी चालकांला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र कायदेशीर बाबीची पूर्तता न झाल्याने जनावरांना अद्याप मालकाच्या स्वाधीन करण्यात आले नाही. त्यामुळे जनावरांची निगा राखण्याचे काम पोलिसांवर आले आहे. चौकीच्या परिसरात जनावरे बांधण्यात आल्याने अनेकांचे लक्ष वेधत आहेत.
राजूरला जनावरे सांभाळताहेत पोलीस
By admin | Published: May 14, 2017 11:40 PM