सा.बां.चे काम चालणार पोलिस बंदोबस्तातजालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज करण्यासाठी पोलिस चौकीव्यतिरिक्त पेड पोलिस बंदोबस्त घेण्याची तयारी या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. त्यासाठीची लेखी मागणी करण्याची सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी मंगळवारी भेटलेल्या शिष्टमंडळास केली आहे.बांधकाम विभागाच्या कार्यालयात २२ आॅगस्ट रोजी एका कंत्राटदाराने तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्यानंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. सोमवारी कार्यकारी अभियंता डी.एन. तुपेकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.त्यापाठोपाठ आज या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले. तसेच पोलिस चौकी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीबरोबरच तोपर्यंत ‘पेड पोलिस बंदोबस्त’ द्यावा, अशीही मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासंबंधीची लेखी मागणी करण्याची सूचना सिंग यांनी केली. पोलिस चौकीमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासनही पोलिस अधीक्षक सिंग यांनी दिले. सोमवारी कर्मचाऱ्यांनी कामकाज बंदच ठेवले होते. आज मंगळवारी सकाळी सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात एकत्र आले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वळविला. तेथे पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आल्यानंतर दुपारी कामकाज सुरू केले. मात्र उपस्थित कर्मचारी दिवसभर तणावग्रस्त होते. या शिष्टमंडळातील काही कर्मचारी कार्यालयात परतले. मात्र अधिकारी व अन्य कर्मचारी कार्यालयाबाहेरच होते. (प्रतिनिधी)
सा.बां.चे काम चालणार पोलिस बंदोबस्तात
By admin | Published: August 27, 2014 1:15 AM