औरंगाबाद: वेगवेगळ्या ठिकाणी दोन रिक्षाचालकाचे एकाच हात चलाखीने मोबाईल पळविणाऱ्या चोरट्यासह त्याच्याकडून मोबाईल विकत घेणाऱ्याला जिंसी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ३ मोबाईल जप्त केले.
मोबाईल चोर शेख उस्मान शेख मोहम्मद (३०,रा. शरीफ कॉलनी) आणि खरेदीदार सय्यद मज्जित सय्यद नजीर अली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की आरोपी उस्मान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अटल मोबाईल चोर आहे. त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती मात्र त्याच्यावर वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. ११ जानेवारी रोजी प्रवासी भाडे घेऊन कटकट येथे गेलेल्या रिक्षाचालकाची नजर चुकून आरोपीने त्यांचा मोबाईल चोरून नेला होता. याविषयी रिक्षाचालकाने पोलिसात तक्रार नोंदविली होती. अन्य एका घटनेत सेंट्रल नाका येथे आणखी एकाचा मोबाईल चोरी झाला होता.
या दोन्ही घटनांचा तपास करीत असताना पोलिसांनी संशयावरून शेख उस्मान त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मोबाईल कटकटगेट येथील दुकानदार सय्यद मज्जित याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीकडून ५० हजाराचे तीन मोबाईल हँडसेट जप्त केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार सुपेकर,संपत राठोड,अरुण शेख,किशोर बुंदिले,संजय गावंडे,नंदलाल चव्हाण आणि संतोष बनावत यांनी केली.