लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण ते औरंगाबाद मार्गावर धारदार शस्त्राने वार करून ज्येष्ठ नागरिकाला लुबाडणाऱ्या तिघांना पैठण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच सर्च ऑपरेशन राबवून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.
लक्ष्मीनगर येथील रहिवासी सुभाष बाप्पुराव डोरले हे मंगळवारी रात्री पैठण - औरंगाबाद मार्गावरील गोलनाका परिसरातील शेतात शौचास गेले होते. यावेळी अचानक तिघांनी सत्तुर या धारदार शस्त्राने डोक्यात वार करून त्यांच्या खिशातील २ हजार रूपये व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर जखमी अवस्थेत सुभाष डोरले यांनी पैठण पोलीस ठाण्यात येऊन लुटमारीची तक्रार दिली.
यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे, रामकृष्ण सागडे, हेडकाॅन्स्टेबल सुधीर ओव्हळ, नाईक, महिला काॅन्स्टेबल सविता सोनार यांना आरोपींच्या मागावर रवाना केले. या दरम्यान गोलनाका परिसरात लपून बसलेल्या आरोपींनी पोलीस आल्याचे पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाठलाग करून पोलिसांनी ईश्वर शेषराव भालके (२०), ऋषिकेश बाळासाहेब चाटुफळे (२२, दोेघे रा. लक्ष्मीनगर, पैठण) व सागर अशोक काते (२१, रा. संतनगर, पैठण) यांना ताब्यात घेतले.
या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांनी मारहाण करून हिसकावून घेतलेला मोबाईल व रोख २ हजार रुपये तसेच सुभाष डोरले यांना ज्या सत्तुरने मारहाण केली तो लोखंडी सत्तुरही जप्त करण्यात आला आहे.