औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे क्रांती चौकात तासभर ठिय्या देण्यात आला. यानंतर आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता सुमारे ३०० ते ४०० तरुण-तरुणींनी हातात विविध फलक घेऊन घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, सारथीचे औरंगाबाद शहरात केंद्र सुरू करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी द्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती करू नका, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती दिली तत्पूर्वीही निवड झालेल्या उमेदवारांना एसईबीसीच्या आरक्षणानुसार नियुक्तीपत्रे द्या, आरक्षण स्थगिती न्यायालयातून उठविण्यासाठी मनापासून प्रयत्न करा, यासह विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा देत होते. सुमारे तासभर आंदोलन झाल्यावर आंदोलक अचानक चौकात उतरले आणि रास्ता रोको करू लागले. यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. रमेश केरे, किरण काळे यांच्यासह महिला आणि तरुण आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात कोंबले. यावेळी पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, पोलीस निरीक्षक दिलीप तारे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यतळ, फौजदार संतोष राऊत, अमोल सोनवणे, कर्मचारी योगेश नाईक, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात केला होता.
चौकट
आंदोलक पळू लागले
पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू करताच आंदोलकांनी जोरदार घोषणा सुरू केल्या. एका वाहनाने काही लोकांना नेल्यानंतर दुसरे वाहन बोलावून अन्य आंदोलकांची धरपकड केली. यावेळी पळापळ सुरू झाल्यामुळे काही आंदोलकांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आणि गाडीत कोंबले.