औरंगाबाद: शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले. या चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली देत सुमारे ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या आठ दुचाकी काढून दिल्या.
लहू रमेश चव्हाण(वय २३) आणि छगल्या उर्फ राहुल एकनाथ पवार(वय २३,दोघे.रा. मुकुंदनगर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. वर्षभरापूर्वी लहूला वाहनचोरी प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर सुटला. तेव्हापासून लहू राहुलच्या मदतीने दुचाकी चोऱ्या करीत होता.
याबाबतची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड,सहायक उपनिरीक्षक हारूण शेख, शेख असलम, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांंनी १० सप्टेंबर रोजी आरोपी लहूला पकडले. त्यावेळी तो चोरीच्या मोटारसायकलने जात होता. त्याला ठाण्यात नेऊन विचारपुस केल्यानंतर सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. आरोपी छगल्या उर्फ राहुल पवार याच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणाहून मोटारसायकली चोरल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छगल्याला अटक केली.
दोघांना समोरासमोर बसून विचारपूस केल्यानंतर लहू हा मोटारसायकलींची चोरी करीत आणि छगल्या उर्फ राहुल पवार हा चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी मदत करीत. शिवाय दोघांनी मिळून अनेक दुचाकीही चोरल्याचे समोर आले. आरोपींनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आणि औरंगाबादेत या मोटारसायकली विक्री केल्या होत्या. त्यांनी विक्री केलेल्या आठ दुचाकी विविध ठिकाणाहून जप्त केल्याचे पोलीस उपनिरीक्षक बनसोड यांनी सांगितले.