औरंगाबाद : गस्तीवर असताना अरेरावी करीत शिवी देणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याने चांगलेच बदडले. ही घटना शहरातील सिटीचौक भागात घडली. मारहाणीची संपूर्ण घटना एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्या कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली.
सिटीचौक पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले संजय नंद हे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कर्मचऱ्यासह सिटीचौक बाजारपेठेत गस्त घालत असताना काही तरुण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत हुल्लडबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने नंद यांनी त्यांना मज्जाव केला. मात्र, त्यातील एकाने नंद यांना आईवरून अश्लील शिवी दिली. तसेच काय करायचे करा, असे म्हणत उद्धट उत्तरे देत होता. अनेकवेळा समजावून देखील तरुण ऐकत नसल्याने नंद यांचा पारा चढला. त्यांनी तरुणाची चांगलीच धुलाई केली.
ही संपूर्ण घटना बाजारपेठेतील एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे प्रकरण समोर येताच पोलिस आयुक्तांच्या आदेशाने नंद यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि.२) रोजी संध्याकाळपर्यंत तरुणाकडून कोणतीही तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.
खा. इम्तियाज जलील यांचे ट्विट..एका गरीब मजुरावर सिटीचौक पोलीस ठाण्यातील या हवालदाराची क्रूरता पहा. पोलीस आयुक्त श्री निखिल गुप्ता यांना विनंती करतो की, संपूर्ण पोलीस खात्याचे नाव बदनाम करणाऱ्या अशा काळ्या मेंढ्यांना दलातून हाकलून द्या. पोलिसांना अशा पद्धतीने वागण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही हे प्रकरण मांडणार आहे. या घटनेचा तीव्र निषेध, असे ट्विट खासदार जलील यांनी व्हिडिओसह केले आहे.