पोलीस काॅन्स्टेबल राजपूत हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते रात्रपाळीची ड्युटी करून मोटारसायकलने घरी जात असताना सेव्हन हिल उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. या अपघातानंतर कोणीही त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुढे येत नव्हते. याचवेळी तेथून जाणारे आरसीपी पथकाचे जवान समाधान पाटील, विजय अजब, अर्जुन भिसे, सतीश जाधव आणि सागर कोळी यांनी अपघात पाहून त्यांचे वाहन थांबविले. जखमीला कोणत्या रुग्णालयात न्यावे याविषयी ते विचार करीत असताना त्याचवेळी रघुनंदन कलंत्री (रा. गजानननगर) यांनी जखमी राजपूत यांना पाहून तातडीने एक रिक्षा थांबविली. उपस्थितांच्या मदतीने त्यांना रिक्षात घेऊन, तेव्हा काहीजण त्यांना घाटीत घेऊन जाऊ असे म्हणत होते. मात्र, कलंत्री यांनी त्यांना आकाशवाणी चौकातील खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांना तातडीने उपचार करण्यास सांगितले. या घटनेची माहिती एपीआय घनश्याम सोनवणे यांना कळविली. सोनवणे यांनी जवाहरनगर पोलीस आणि जखमींच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. जखमी राजपूत यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची जवाहरनगर ठाण्यात नोंद करण्यात आली.
दुचाकीवरून पडल्याने पोलीस काॅन्स्टेबल जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:03 AM