औरंगाबाद : गावाहून घरी परतणाऱ्या मुलाला रेल्वेस्थानक येथे घ्यायला निघालेल्या पोलीस हवालदाराच्या चारचाकीला भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात हवालदाराचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या पाचच्या सुमारास छावणी परिसरातील टोल नाक्याजवळ घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवचंद माधवराव कुऱ्हाडे (वय 50, रा. पाडेगाव, औरंगाबाद) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुऱ्हाडे हे छावणी ठाण्यात कार्यरत होते. या अपघाताप्रकरणी छावणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुऱ्हाडे हे छावणी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा बाहेर गावाहून आज पहाटेच्या रेल्वेने औरंगाबादला येणार असल्याने कुऱ्हाडे हे एका नातेवाईकासोबत पहाटे पाच वाजेच्या दरम्यान ( एम एच 20 इ जे 7065) या चारचाकीने कारने पडेगाव येथून रेल्वेस्थानकाकडे निघाले. छावणी परिसरातील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या (एच आर 30 एस 6982) या मालवाहू ट्रकने कुऱ्हाडे यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कुऱ्हाडेसह त्यांचे नातेवाईक गंभीररीत्या जखमी झाले.
त्यांना तातडीने पोलिसांनी घाटी रुग्णालायत दाखल केले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. हवालदार कुऱ्हाडे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर त्यांच्या नातेवाईकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत.