औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असताना दारूच्या नशेत पिस्तूल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविणार्या पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यास पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस खात्यातून तडकाफडकी बडतर्फ केले. ही कारवाई टाळण्यासाठी स्वामी याने मंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांवर दबाव आणला होता, हे विशेष.
६ जानेवारीच्या रात्री अमित स्वामी यांनी प्रथम भोईवाडा येथील त्याच्या खोलीत मद्य प्राशन केले. यानंतर अमित यांनी हनुमाननगर येथे नव्याने खोली भाड्याने घेतली होती. यामुळे त्यांनी भोईवाडा येथील खोलीतील त्यांचे सामान हनुमाननगर येथे हलविण्यासाठी ते रिक्षाचा शोध घेत होते. यावेळी त्यांना त्याच्या ओळखीचा रिक्षाचालक मित्र आणि अन्य एक जण भेटले. त्यांच्यासोबत त्यांनी पुन्हा एकत्र बसून मद्य प्राशन केले. एवढेच नव्हे तर त्यांनी एकत्र पिस्तूलसोबत सेल्फीही काढली. रात्री १०.४० वाजेच्या सुमारास रिक्षात सामान टाकून हनुमाननगरकडे निघाले. रिक्षाने जात असताना रस्त्यातच अमित नशेत तर्र झाल्याने ते रिक्षात झोपले. आवाज देऊनही अमित उठत नसल्याने आणि हनुमानगरमधील त्यांची नवीन खोली माहित नसल्याने अर्ध्या रस्त्यातून ते परत भोईवाड्याकडे जाऊ लागले. आकाशवाणी चौकात त्यांच्या रिक्षाला अपघात झाला तेव्हा अमितचे पिस्तूल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत अमित जखमी झाला होता तर त्याच्या मित्रांना किरकोळ मार लागला होता.
या घटनेनंतर दुसर्या दिवशी पोलीस आयुक्तांनी अमितला निलंबित केले.जवाहरनगर आणि गुन्हेशाखा पिस्तूल आणि दहा राऊंडचा शोध घेत आहे, मात्र अद्यापही हे शस्त्र पोलिसांना मिळाले नाही. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी अमित यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याची कारवाई केली. या कारवाईची माहिती पोलीस आयुक्तांनीच गुरूवारी पत्रकारांना दिली.