औरंगाबाद: बंजारा कॉलनी, बहादुरपुरा येथील रहिवासी पोलीस नाईक कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
उमाकांत पद्माकर पाटील (५२)असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, उमाकांत पाटील हे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते. उमाकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणाची केस कोर्टात प्रलंबित आहे. त्यांच्या या केसची सोमवारी सुनावणी होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. यांनतर ते झोपले.
दरम्यान पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास त्यांनी जिन्याखालील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. यांनतर शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी उमकांत यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
उमाकांत यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचा मुलगा दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी करतो. मुलगा नोकरीला लागल्यापासून उमाकांत आणि त्यांची पत्नीच घरी राहात होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत.