औरंगाबाद : खुनाच्या प्रकरणातून जामिनावर मुक्त होताच मारहाण करून मजुराला लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना (विधिसंघर्षग्रस्त बालक) गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. पकडलेली दोन्ही मुले बायजीपुरा परिसरातील रहिवासी आहेत.
कर्णपुरा परिसरातील सचिन लक्ष्मण देशमुख (३७) हे २० डिसेंबर रोजी पंचवटी चौकात उभे असताना दोन अनोळखींनी त्यांना भावसिंगपुरा भागातील संभाजी चौकात नेऊन सोडण्याची विनंती केली. मदतीच्या भावनेने देशमुख यांनी स्वत:च्या दुचाकीवरून भावसिंगपुरा येथे नेले.
रात्री सात वाजेच्या सुमारास दोन्ही मुलांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील २२ हजारांची सोनसाखळी, सहा हजारांचा मोबाईल, रोख ९०० रुपये आणि आधार कर्ड असलेल्या पाकिटासह दुचाकी हिसकावून नेली होती. याविषयी देशमुख यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती.
ही लुटमार दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांनी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना गुरुवारी मिळाली. त्यावरून सपोनि जारवाल, जमादार शिवाजी झिने, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, विशाल सोनवणे यांनी त्यांना पकडून छावणी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या बालकांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.