औरंगाबाद : बँका, खाजगी फायनान्स कंपन्या आपली थकबाकी वसूल करण्यासाठी जशा ‘दबंगगिरी’चा सहारा घेतात अगदी त्याच धर्तीवर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलीस आयुक्तांच्या मदतीने ‘खाक्या’ दाखवीत करवसुली करण्याचा ‘फंडा’ अवलंबिला आहे. शहरातील बड्या थकबाकीदारांना मनपाने नोटिसा बजावून बुधवारी सकाळी सराईत गुन्हेगारांप्रमाणे चक्क पोलीस आयुक्तालयात ‘हजर’ राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आणि मनपाच्या या दादागिरीबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.आजघडीला औरंगाबाद महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पार डबघाईला आलेली आहे. आजपर्यंत मालमत्ता करवसुलीकडे कोणताही अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकीचा आकडा आता तब्बल ३०० कोटींच्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. कराशिवाय मनपाकडे उत्पन्नाचा दुसरा मोठा स्रोतच राहिलेला नाही. उत्पन्नाचे दुसरे मोठे साधन नाही अन् वसुली नाही, अशा या परिस्थितीमुळे मनपाच्या तिजोरीत खडखडात आहे. खडखडाटामुळे शहरातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. आता कोठे मनपाला करवसुली गरजेचीच आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. मात्र, या वसुलीसाठी मनपा प्रशासन हे चक्क खाजगी बँका, फायनान्स कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा नमुना पाहावयास मिळाला होता. थकीत करवसुली करताना वाद झाल्यानंतर मनपाचे वॉर्ड अधिकारी विठ्ठल डाके यांनी चक्क थकबाकीदार असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश पवार यांनाच रिव्हॉल्व्हर लावले होते. रिव्हॉल्व्हरच्या धाकावर करवसुलीचे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. रिव्हॉल्व्हरच्या धाकावर वसुलीनंतर आता खुद्द मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ‘पोलिसी खाक्या’ दाखवीत वसुलीचा फंडा हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या दरबारात आम्हाला कर वसुलीसाठी मदत करण्यासाठी विनंती केली. पोलीस आयुक्तांनीही ही विनंती मान्य करीत पोलिसांचा अधिकार नसतानाही ‘वसुली’साठी (पान ५ वर)महापालिका वसुलीसाठी सक्षमसायंकाळी उशिरा शहरातील नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. सेना नेत्यांनीही यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याची ही पद्धत योग्य नाही. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया हे स्वत: एक सक्षम आयुक्त आहेत. त्यांनी मनपा कार्यालयात थकबाकीदारांची बैठक आयोजित करणे अपेक्षित होते. नागरिकांमध्ये दहशत, घबराट निर्माण करून वसुली करणे योग्य नाही. महापालिका पदाधिकारी आणि संपूर्ण नगरसेवक नेहमीच प्रशासनासोबत आहेत. मनपाचा स्वतंत्र कायदा आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनही वसुली करता येऊ शकते. उद्या सकाळी ९.३० वाजता आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.त्र्यंबक तुपे, महापौरजप्तीसाठी पोलिसांचे सहकार्यशहरात मनपाला १०० कोटी रुपयांची वसुली करायची आहे. अनेकदा या थकबाकीदारांकडे मनपाचे पथक गेल्यावर पिटाळून लावण्यात येते. कर्मचाऱ्यांना धमकावण्यात येते. यापुढे आम्ही थेट जप्तीची कारवाई करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक जप्तीच्या पथकात पोलीस कर्मचारी ठेवणार आहोत. या कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे बैठक आयोजित केली आहे. सुज्ञ नागरिकांनी किंवा मालमत्ताधारकांनी मनपाच्या नोटीसचा अर्थ चुकीचा लावू नये. आम्हीच पोलीस आयुक्तांकडे ही बैठक आयोजित केली. पोलिसांनाही विनंती केली. शहराच्या विकासासाठी हे काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.ओम प्रकाश बकोरिया, मनपा आयुक्तबकोरिया यांनीच विनंती केलीही बैठक आम्ही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या विनंतीवरूनच ठेवलेली आहे. मनपाच्या कराची थकबाकी २९५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. मालमत्ताधारक मनपाच्या यंत्रणेला जुमानत नाहीत. वसुलीला गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण होत आहे. त्यामुळे वसुलीसाठी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी अशी वारंवार विनंती मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आपणही बैठकीस संमती दिली. मालमत्ता कराच्या वसुलीत पोलिसांची कोणतीच भूमिका येत नाही. बैठकीत फक्त सूचना करण्यात येतील. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त
करवसुलीसाठी मनपाचा चक्क ‘पोलिसी खाक्या’!
By admin | Published: June 07, 2016 11:45 PM