छत्रपती संभाजीनगर : शहागंज, सराफा मार्केट मधील बाजारपेठेत बनावट नोटा खपवण्याचा मोठा डाव सिटीचौक पोलिसांमुळे उघडकीस आला. संशयित आरोपी ५०० रुपयांच्या २ दोन लाखांच्या बनावट नोटा घेऊन येताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. संतोष विश्राम शिरसाठ (४९, रा.राजीव नगर, जहागिरदार कॉलनी) असे त्याचे नाव असून त्याच्याकडील बनावट नोटाज जप्त करत अटक करण्यात आली.
सिटीचौक पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक अर्जुन कदम यांना गुप्तबातमीदारकाडून बनावट नोटांच्या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती. एक अनोळखी इसम शहागंज परिसरात शुक्रवारी बनावट नाेटा घेऊन येणाऱ असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार कदम यांनी शहागंज मधील एका दुकानामसोर सहकाऱ्यांसह सापळा रचला. हातात पिशवी घेतलेला शिरसाठ प्लॅस्टिक वस्तुंच्या दुकानासमोर येऊन थांबला. तेव्हा पथकाने तत्काळ त्याच्या मुसक्या आवळून ठाण्यात नेले. त्याच्याकडील पिशवी तपासली असता त्यात ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा आढळून आल्या.
सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या शिरसाठ ने पोलिसी खाक्या दाखवताच काही मिनिटांमध्ये त्यानेच त्या विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. या रॅकेटचा अधिक तपास पोलिस करत आहेत. उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त महेेंद्र देशमुख, परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कदम, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, अंमलदार सुरेश बोडखे, आनंद वाहुळ, अन्वेज शेख, प्रविण टेकले, बबन इप्पर यांनी कारवाई केली.