औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ३५ वर्षांपूर्वी सिडको एन ८ मध्ये पोलीस वसाहत बांधण्यात आली. तेथे शहर पोलीस दलातील सुमारे सव्वादोनशे कुटुंबे राहतात. येथील अनेक इमारती राहण्यायोग्य नसल्याने शेकडो कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने सोडून दिली आहेत. या कॉलनीलगतच पोलीस पब्लिक स्कूल आहे. वसाहत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पोलिसांचा या वसाहतीला पहिली पसंती होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून या वसाहतीमधील इमारतीच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले.
या कॉलनीतील रोहिणी इमारतीमधील रहिवासी बारा दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते. इमारतीमधील पोलीस कुटुंबीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलची मोटारपंप नादुरुस्त झाली होती. याकडे लक्ष वेधल्यानंतरही बारा दिवस कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. वसाहतीच्या स्वच्छतेसाठी पूर्वी ८ सफाई कर्मचारी होते. हे कर्मचारी कपात करून चार रोजंदारी मजुरांकडून काम करून घेतले जाते. वसाहतीतील ड्रेनेज सतत चोकअप होत आहे. यामुळे ड्रेनेज चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी कॉलनीत वाहत असते. एका रहिवासी पोलिसाने आतापर्यंत १५ तक्रारी केल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले; मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याचे ते म्हणाले.
चौकट..........
सा.बां. विभागाच्या सेवा केंद्राला कुलूप
विशेष म्हणजे पोलीस कॉलनीचे प्रश्न सोडविण्यासाठी तेथे असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवा केंद्राला नेहमी कुलूप असते. रहिवासी कुटुंबीयांकडून नागरी समस्येसंदर्भात तक्रार आल्यास लाईन हवालदार ही तक्रार सा.बां. विभागाच्या स्थानिक कार्यालयास देतो; मात्र हे कार्यालय बंद असते तेव्हा संबंधित अभियंत्यांना फोनद्वारे कळविले जाते; मात्र बांधकाम विभागाकडून सतत निधीची कमतरता असल्याचे कारण दिले जाते. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारीही यासाठी पाठपुरावा करीत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.