वैजापूर : खड्ड्यांमुळे अपघात वाढत असूनही संबंधित यंत्रणा हे खड्डे भरत नसल्याने आता पोलिसच पुढे सरसावले आहेत.अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी वैजापूर पोलिस ठिकठिकाणी खड्डे भरण्यासाठी रस्त्यावर दिसले. हे काम आमचे नसले, तरी त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आम्ही हे करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खड्डयामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. शहरातील लक्ष्मी टॉकीज ते खंडाळा या अकरा किलोमीटर अंतरावर तब्बल ५६ जीवघेणे खड्डे असल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आले. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात आजवर अनेक बळी गेले आहेत, तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदुंन ठेवल्याने साईडपट्ट्याच नसल्याने या रस्त्यावर दररोज अपघाताला आमंत्रण मिळते. ही अपघातामागील मुख्य कारणे पोलिसांना दिसून आली.
विशेष म्हणजे संबंधित यंत्रणांना लेखी तोंडी कळवूनही यावर कारवाई होत नव्हती. अखेर शनिवारी वैजापुर पोलिसांनीच यासाठी पुढाकार घेतला.पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, एपीआय अमोल ढाकने, पोलिस नाईक संजय घुगे, जालिंदर तमनार, अजयसिंग गोलवाल, रज़्ज़ाक शेख,मनोज कुलकर्णी, मोइज बेग,यांच्यासह इतर पोलिसांनी तब्बल अकरा किलोमीटर अंतरावर असलेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम शनिवार पासून सुरु केले आहे. पोलिस ठाण्यातील इतर सहकाऱ्यांची साथ मिळाली आणि आम्ही खड्डे बुजविण्यास सुरु केले, असे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले.