ऑनलाईन लोकमत
नांदेड, दि. २७ - पॅरोल वरून तुरूंगात न परतणा-या अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने तलवारीने हल्ला केला. हल्ला करत तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीवर पोलिसांनी गोळीबारात जखमी केले व ताब्यात घेतले. हि थरारक घटना आज सकाळी लिम्बगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळणी येथे घडली.
आरोपी संतोष धुतराज याच्यावर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. तो काही दिवसापूर्वीच पॅरोलवर तुरूंगातून बाहेर आला होता. मात्र; मुदत संपली तरी तो तुरुंगात पोह्चलाच नाही. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. लिम्बगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळणी येथे तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानुसार आज सकाळी पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी तळणी येथे पोहोंचले. परंतु; पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला व तेथून पळ काढला. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्याचा तलवारीचा वार चुकवला आणि पळ काढणा-या धुतराजचा त्यांनी पाठलाग सुरु केला. यावेळी त्याच्या हातात तलवार असल्याने पोलिसांना त्यास पकडने कठीण जात होते. यामुळे शेवटी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला व त्यास जखमी केले व ताब्यात घेतले. उपचारासाठी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्यासह मोठे पथक होते.