लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर शहर आणि उदगीर शहरात मंगळसूत्र, गंठण पळविणारी टोळी सक्रीय आहे़ त्याचबरोबर दुचाकी चोर, घरफोडी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून, या टोळीच्या कारवायापुढे पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़ गेल्या चार महिन्यांत चोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना जवळपास १२० पेक्षा अधिक घडल्या आहेत़ सर्वाधिक दुचाकी आणि गंठण पळविण्याच्या घटनांचा समावेश आहे़ लातूर शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलांवर नजर ठेवत दुचाकीवरून पाठलाग करीत गंठण पळविणारी टोळी सक्रीय आहे़ याबाबत लातूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे़ तक्रार दाखल करून घेण्यापलिकडे पोलीस प्रशासनाचा तपास पुढे सरकत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे़ दिवसा लुटलुटीच्या घटना घडत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे़ देवदर्शनासाठी, बाजारासाठी त्याचबरोबर पहाटेच्या वेळी फिरायला बाहेर पडलेल्या महिला आणि वृद्ध मंडळींना या टोळीकडून लक्ष्य केले जात आहे़ दररोज शहरातील कुठे ना कुठे मंगळसूत्र, गंठण पळविण्याच्या घटना घडत आहेत़ याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिकांतून होत आहे़ एकाच दिवशी दोन ठिकाणी गंठण पळविणाच्या घटना गेल्या तीन दिवसांपूर्वी घडल्या़ विशेष म्हणजे पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या पत्नीचेही गंठण पळविल्याची घटना घडली़ जिथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्य व्यक्ती कसा सुरक्षित राहील, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़ शहरातील गर्दीच्या ठिकाणी अथवा घरासमोर पार्किंग केलेल्या वाहनांच्या चोरीचेही प्रमाण वाढले आहे़ दुचाकी पळवून परस्पर विल्हेवाट लावणारी टोळीच सक्रीय असून, याबाबत पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही.
गंठण पळविणाऱ्या टोळीकडे पोलिसांची डोळेझाक !
By admin | Published: May 08, 2017 12:12 AM