ऑनलाईन लोकमत
वैजापुर ( औरंगाबाद ), दि. १४ : घातपात करणे किंवा भाईगिरी करून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने पिस्तूल खरेदी-विक्री करणाऱ्या एका युवकाला औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन दोन गावठी पिस्तूलासह पकडले. यावेळी पोलीसांसोबत झालेल्या झटापटीत दोन संशयित अंधाराचा फायदा घेत दूचाकीवर फरार झाले. ही कारवाई रविवारी (दि.१३) रात्री अकराच्या सुमारास वैजापुर तालुक्यातील नांदगांव शिवारात करण्यात आली.
नाशिक औरंगाबाद महामार्गावरील नांदगांव जवळ पिस्तूलची खरेदी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीनुसार नांदगांव शिवारातील शेत गट नंबर ४६ जवळ रविवारी रात्री संशयास्पदरीत्या उभे असलेले तिन युवकास पोलिसांनी हटकले असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकाला पकडले तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. यावेळी झटापटीत पोलीस नाईक किरण गोरे जखमी झाले. पकडलेल्या युवकाच्या झडतीत दोन गावठी पिस्तूल अाढळले.
सदर कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक विवेक जाधव,गणेश मुळे,किरण गोरे,नदीम शेख, प्रमोद साळवी,बाबा नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.