छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. संतोष हरिभाऊ लहाने (३०,रा.इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे घरफाेड्याचे नाव आहे. या आरोपीकडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
गारखेडा परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणारा अट्टल घरफोड्या संतोष लहाने हा रेल्वेस्टेशन परिसरात आला असल्याची माहिती विशेष पथकाचे उपनिरीक्षक वसंत शेळके यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक केंद्रे यांनी पथकास सापळा लावण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने रेल्वेस्टेशन परिसरात सापळा लावला. या सापळ्यात संतोष लहाने हा अलगतपणे आडकला. त्याची चौकशी केली असता त्याने जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या चोरीतील १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांना काढून दिला. ही कारवाई निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वसंत शेळके, पोलिस अंमलदार चंद्रकांत पोटे, मारोती गोरे यांच्या पथकाने केली.
तीन दिवसाची पोलिस कोठडीघरफोड्या करणारा आरोपी संतोष लहाने यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. या कोठडीत त्याच्याकडून इतरही ठिकाणच्या घरफोड्यांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.