वाळूज महानगर : सांडपाणी व टवाळखोर तरुणांच्या दहशतीने त्रस्त झालेल्या रांजणगावातील नागरिकांनी मंगळवारी थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपली कैफियत मांडली, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
रांजणगावातील कृष्णानगर येथे एका खाजगी गाळ्यात कायदेशीर सल्ला केंद्र व सेप्टिक टँक सफाईचे कार्यालय आहे. केंद्रचालक सेप्टिक टँकमधील सांडपाण्याची वसाहतीलगतच्या नाल्यात विल्हेवाट लावतो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. याविषयी नागरिकांनी संबंधित गाळे मालकाला सांगितले; मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले, तसेच टवाळखोर तरुण कार्यालयात रात्री उशिरापर्यंत मद्यपान करण्यासह दहशत पसरवितात. दररोजच्या या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांनी मंगळवारी दुपारी थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली. यावेळी नागरिकांनी डीबी पथक प्रमुख फौजदार राहुल रोडे यांना तक्रारीचे निवेदन देऊन केंद्रचालक एम.के. दाभाडे याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
निवेदनावर दीपा अहिरे, राधा ठाकूर, शकिला शेख, रामा कीर्तिकर, शमीना शेख, सुलताना गफू र, मीना दणके, वंदना कांबळे, सोनी चंडालिया, मंजू वाल्मीकी, बबिता तरकसे, विमल कीर्तीकर, प्रवीण काकडे, बाबासाहेब कीर्तीकर, अशोक कीर्र्तीकर आदींसह जवळपास ६० जणांची नावे आहेत. दरम्यान, याविषयी एम.के. दाभाडे यांनीही नागरिक विनाकारण त्रास देत असून, कार्यालयातील व रसवंतीगृहातील साहित्याची तोडफोड करून जिवे मारण्यची धमकी दिली असल्याची तक्रार दिली आहे.