औरंगाबाद : २० लाख रुपये गृहकर्ज देण्याची थाप मारून दोन सायबर भामट्यांनी चक्क एका फौजदाराला ९० हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले. याविषयी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांच्या बिनतारी संदेश विभागातील फौजदार प्रमोद विनायकराव तुळसकर यांना एका अनोळखी मोबाईलधारकाने कॉल करून त्याने त्याचे नाव शंकर सांगून तो एका फायनान्स कंपनीचा अधिकारी असून, अत्यंत कमी दरात सरकारी कर्मचाऱ्यांना गृहकर्ज देत असल्याचे सांगितले. झटपट २० लाख रुपये गृहकर्ज मंजूर झाल्याचे सांगितले.
नंतर हरीश आहुजा नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांना कॉल करून कर्ज मंजूर फाईलची कागदपत्रे पडताळणीसह विविध प्रकारच्या चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या रकमा त्यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यात जमा करायला लावल्या. फौजदार तुळसकर यांनी कर्जाच्या आमिषाला बळी पडून आरोपींच्या खात्यात तब्बल ९० हजार २५० रुपये जमा केले. यानंतरही आरोपींनी तक्रारदारांना कर्जाची रक्कम दिली नाही. पोलीस ठाणे गाठून याविषयी तक्रार नोंदविली.