लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वत:ची मार्केटिंग करण्यासाठी रस्त्यावर आणि चौकाचौकांत पोस्टर लावून शहर विद्रूप करणाऱ्या भाऊ-दादांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. २४ तासांत पोस्टर काढून घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.शहरातील विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये मोठ्या संख्येने भाऊ-दादा तयार झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून आणि समर्थकांकडून चौकाचौकांत आणि प्रमुख रस्त्यांवर पोस्टर्स लावण्यात येतात. यातील ९० टक्के पोस्टर हे मनपाच्या परवानगीविना असतात. यामुळे मनपाचा महसूल बुडतो आणि शहराचे विद्रुपीकरणही होते. शिवाय पोस्टरवरून भांडणे होतात. फेब्रुवारी महिन्यात पोस्टरवरून दंगल झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणेप्रमुखांना पोस्टर काढण्याचे आदेश दिले. ठाणेदारांनी लगेच पोस्टर लावणाºयांना नोटिसा पाठवून २४ तासांत रस्त्यावरील पोस्टर काढा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा दिला. पोलिसांच्या या इशा-यामुळे भाऊ-दादांचे धाबे दणाणले आहे. जिन्सी पोलिसांनी रोशनगेट, मध्यवर्ती जकातनाका, चंपा चौक, जिन्सी आदी ठिकाणी पोस्टर लावणा-यांविरोधात तर पुंडलिकनगर पोलिसांनी मुख्य रस्त्यावर पोस्टर लावणाºयांना रस्त्यावरील बॅनर काढून घेण्याचे आदेश दिले. अशाच प्रकारच्या नोटिसा आणि सर्व ठाणेदारांनी दिल्या असून २४ तासांत पोस्टर न काढल्यास मनपाला सोबत घेऊन ही कारवाई सुरु केल्याचे अधिका-यांनी सांगितले.
पोस्टरवरील भाऊ-दादांना पोलिसांच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:02 AM