पैठण : पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करून लवकर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापका कडून १० हजार रूपयाची लाच घेताना बिडकीन पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला लाच लुचपत विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. सतीश प्रल्हादराव बोडले (५४) हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर १८४ पोलीस ठाणे बिडकीन असे लाच स्विकारलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
तक्रारदार बिडकीन येथील पतसंस्थेचे मॅनेजर आहेत. बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास लवकर करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करावे, तसेच पतसंस्थेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी जमादार सतिश बोडले याने सोमवारी पंचासमक्ष १० हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, आज दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात पंचासमक्ष दहा हजार रूपयाची लाचेची रक्कम जमादार बोडलेने स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने बोडलेस ताब्यात घेतले.
याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोअंमलदार भीमराज जीवडे, सुनील पाटील, विनोद आघाव, अंमलदार चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली आहे.