बाजारसावंगी : परिसरातील महिलांनी दारूबंदीसाठी लढा दिला. त्यानंतर, गावातील दारूविक्री बंद झाली. मात्र, अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांनी तोंडवर काढले आहे. अशा विक्रेत्यांवर बाजारसावंगी व खुलताबाद पोलिसांतर्फे धडक कारवाई केली गेली आहे, तर यापुढेही अवैध विक्रेत्यांचा सुफडा साफ करण्याचा निश्चय पोलिसांनी केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी दिली. त्यामुळे महिलांचा लढा वाया जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाजारसावंगी येथील महिला व जय बाबाजी भक्तमंडळ परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील दारूबंदी केली. त्यानंतरही परिसरात मोठ्या प्रमाणात सर्रासपणे दारूविक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवार व बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत बाजारसावंगी परिसरातील ३१ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती, तर यापुढे अवैधरीत्या दारू विक्रेत्याचा सुफडा साफ करण्याचा निश्चय पोलिसांनी केलेला आहे. जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे यांनी येथील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे. यापुढे पथक नेमून कारवाई अधिक जोमाने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.