औरंगाबाद, दि. २६ : एमबीबीएसला नंबर लागलेल्या मुलीच्या फीसचा ७० हजारांचा डिमांड ड्राफ्ट आणि रोख १ लाख रुपयांसह कागदपत्रांची बॅग प्रवासा दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ( दि. २५ ) रिक्षात विसरली. याची माहिती पोलिसांना मिळताच चार्ली पथक, गुन्हे शाखा यांनी सेफ सिटी कॅमे-यांची मदत घेत अवघ्या सात तासांत ती रिक्षा शोधून बॅग परत मिळवली.
याविषयी अधिक माहिती अशी की, सेलू (जि. परभणी) येथील मारोती सोपानराव मानवतकर या शेतक-यास दोन मुली आणि एक मुलगा आहे. ते शेती विक्री करून मुलींचे शिक्षण करीत आहेत. त्यांच्या लहान मुलीला मुंबईतील केईएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला. तिची प्रवेश फी भरण्यासाठी ७० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आणि रोख १ लाख रुपये ते सोबत घेऊन गेले होते. काही कारणामुळे त्यांच्या मित्राने त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केल्यानंतर त्यांनी बँकेला धनादेश देऊन दुसरा डी.डी. काढून तिची फी भरली. यामुळे त्यांनी सोबत नेलेला डी.डी. आणि रोख रक्कम घेऊन शुक्रवारी दुपारी रेल्वेने ते मुंबईहून औरंगाबादेत परतले.
घाटीत एमबीबीएसचे शिक्षण घेणा-या मोठ्या मुलीला तिची फी देण्याचे त्यांनी ठरवले होते. तत्पूर्वी बसय्येनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या नातेवाइकाला भेटण्यासाठी ते शुक्रवारी सायंकाळी ४.४१ वाजता रेल्वेस्टेशन येथून आकाशवाणी चौकात आले. ते रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षा पुढील प्रवासाला गेली. यानंतर ते हॉस्पिटलच्या दिशेने पायी जात असतानाच १ लाख ७० हजार रुपयांची बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी तेथून जाणारे चार्ली पो.कॉ. अनिल कोमटवाड यांना थांबवून त्यांनी घटनेची माहिती दिली.
यानंतर चार्ली कोमटवाड हे मानवतकर यांना सोबत घेऊन पोलीस आयुक्तालयातील सेफ सिटी प्रकल्पाच्या कार्यालयात गेले. तेथील सीसीटीव्हीने कॅमे-यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती गुन्हे शाखा निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी नितीन मोरे, मनोज चौहान, भगवान शिलोटे, हकीम पटेल, अयूब पठाण आणि चालक बहुरे यांना दोन रिक्षांचे क्रमांक मिळाले. या दोन्ही रिक्षा शोधल्यानंतर यापैकी एक रिक्षा हर्सूल परिसरातील एकतानगर येथील संतोष भोळे चालवत असल्याचे पोलिसांना समजले. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यास शोधले तेव्हा रिक्षात बॅग जशीच्या तशी असल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चार्लीची अशीही माणुसकी...पैशाची बॅग गेल्याने मानवतकर यांच्याजवळ एक रुपयाही नव्हता. मुलींच्या वसतिगृहात ते मुक्कामी राहू शकत नसल्याने चार्ली कोमटवाड यांनी माणुसकी दाखवत त्यांना स्वत:च्या घरी नेले. तेथे त्यांना पैसे सापडतील, असा धीर देत जेवणाचा आग्रह केला; मात्र त्यांनी जेवण केले नाही. रात्री १.३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेने त्यांना फोन करून बॅग सापडल्याचे कळविल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले.